हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 07 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करू यासंबंधी पिढ्यानपिढ्या एक कथा सांगितली जाते. एकेदिवशी लाडके बाप्पा मुषकावर सवार होऊन मोठ्या लगबगीने कुठे तरी जात होते. तेव्हा त्या गडबडीत असताना ते घसरले. दरम्यान त्यांना घसरताना पाहून चंद्र जोरजोरात हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला खूप राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाले, "आजपासून तुझं तोंड कोणी पाहणार नाही. जो तुझं तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल".
गणपती बाप्पाच्या या बोलण्याने चंद्र चांगलाच घाबरला. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्याने मोठे तप केले. चंद्राच्या भक्तीने बाप्पादेखील प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापातून मुक्त केलं. पण तरीही गणेश चतुर्थीला तुझं तोंड कोणी पाहणार नाही. जो तुझं तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल" ही अट कायम ठेवली.
त्यानंतर चंद्राने बाप्पाकडे विनंती केली की,"जर एखाद्याने चुकून त्या दिवशी चंद्राचे दर्शन केले तर त्याने काय करावे. माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला नको". त्यावर बाप्पाने सांगितलं की,"संकष्ट चतुर्थी व्रत केल्यास खोट्या आळातून त्या व्यक्तिची सुटका होईल.